शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीनंतरही रिक्त असलेल्या सुमारे 40 हजार जागांवर प्रवेश देण्यासाठी चौथी फेरी राबवण्यात यावी अशी मागणी युवासेनेने शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांना नुकतेच निवेदन दिले. या शिष्टमंडळात सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात, धनराज कोहचाडे आणि मिलिंद साटम यांचा समावेश होता. आरटीईअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात राज्यामध्ये 9195 खासगी विनाअनुदानित शाळा पात्र असून त्यात 116808 इतकी प्रवेश क्षमता आहे. त्या प्रवेशांकरिता 2,45,498 अर्ज आले होते. प्रवेशाच्या तीन फेऱ्यांमध्ये 1,24,458 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी 76,885 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. 65.82 टक्के रिक्त जागांवर प्रवेश झाले आहेत आणि 34.18 टक्के जागा रिक्त आहेत असे निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच आरटीई प्रवेश प्रक्रिया दरवर्षी फेब्रुवारीमध्येच सुरू करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले असून युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून ते प्रसिद्धीस देण्यात आले.


























































