
सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी नवी मुंबईतील सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीचा भूखंड बिवलकर कुटुंबाला नियमबाह्य पद्धतीने दिला. सिडको आणि राज्य सरकारचे सर्व नियम, अभिप्राय धाब्यावर बसवत अवघ्या 48 तासांत हा भूखंड बहाल केला गेला. त्यामुळे गणरायाचे आगमन होण्यापूर्वी दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केली.
नवी मुंबईतील सिडकोचा सुमारे ५ हजार कोटी रुपये किंमतीचा भूखंड बिवलकर कुटुंबाला देताना सर्व नियम, अभिप्राय धाब्यावर बसवून या फाईलने कसा बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रवास केला, याचे आणखी सुमारे १२ हजार पानांचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. विशेष म्हणजे साधा जातीचा किंवा उत्पन्नाचा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2025
रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईतील सिडकोच्या 61 हजार चौरस मीटर भूखंडाच्या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या कार्यालयावर धडक दिली होती. रोहित पवार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला. या वेळी त्यांनी 12 हजार कागदपत्रांच्या पुराव्यांची बॅग सादर केली. या पुराव्यांचा पेन ड्राइव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. बिवलकर कुटुंबाला देण्यात आलेला भूखंड परत घेण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तज्ञ वकील नेमावेत, अशी मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली.