
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या एका टॉप कमांडरची हत्या करण्यात आली आहे. अब्दुल रहमान मुनव्वर असं या तालिबान कमांडरचं नाव आहे. त्याच्याकडे फरयाब प्रांतातील अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी होती.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, मुनव्वर हा आपल्या घरी जात असताना काही सशस्त्र लोकांनी त्याच्यावर हल्ला करून त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. पण, अद्याप हत्या करणाऱ्यांचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. त्यामुळे तालिबान्यांनी ठिकठकाणी छापेमारी करायला सुरुवात केली आहे. यापाठी इसिसच्या एका स्थानिक बंडखोर पथकाचा हात असल्याचं बोललं जात आहे.
मुनव्वर याच्या हत्येच्या वृत्ताला फरयाब प्रांताचा माहिती आणि संस्कृती कार्यवाह प्रमुख शम्सुल्ला मोहम्मद याने दुजोरा दिला आहे. इस्लामी अमिरातने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या हत्येमागचा हेतू अस्पष्ट आहे. तसंच कोणत्याही संस्थेने किंवा संघटनेने या हत्येची जबाबदारी घेतलेली नाही. ऑगस्ट 2021मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने इथे सत्ता स्थापन केली. त्यानंतर इथे गुन्ह्यांचा दर खूप वाढला असून तालिबानचे कमांडरही या गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत.

























































