हात जोडून नमस्कार, शाल पांघरून सन्मान! तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि डीएमके (DMK) प्रमुख एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी कालच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या या पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वांनाच चकित केले. यातच आज झालेल्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या भेटीचे फोटो समोर आले असून, त्यात मुख्यमंत्री विजय हे काळ्या सूटमध्ये हात जोडून स्टॅलिन यांचे अभिवादन करताना दिसत आहेत. स्टॅलिन यांनीही तितक्याच आदराने त्यांच्या अभिवादनाला प्रतिसाद दिला. विजय यांनी स्टॅलिन यांना शाल पांघरून त्यांचा सन्मानही केला. यासंदर्भात एनडीटीव्ही इंडियाने वृत्त दिले आहे.

दरम्यान, विजय यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मदतीने तामिळनाडूमध्ये नवे सरकार स्थापन केले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमवण्यात ते यशस्वी ठरले. ४ मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. विजय यांनी तब्बल चार वेळा राज्यपालांची भेट घेतली. सुरुवातीच्या तीन भेटींमध्ये ते राज्यपाल अर्लेकर यांना बहुमताच्या दाव्याबाबत समाधानी करू शकले नव्हते. त्यावेळी अनेक राजकीय समीकरणांची चर्चा होती. मात्र अखेर सर्व अडथळे पार करत विजय यांनी सत्ता स्थापन केली आहे.