ट्रम्प टॅरिफचा परिणाम देशात दिसू लागला, तामिळनाडूतील अनेक कापड कंपन्यांनी थांबवले उत्पादन

तमिळनाडूच्या तिरुप्पूर येथील वस्त्रोद्योग क्षेत्राला अमेरिकेने हिंदुस्थानवर लादलेल्या नव्या टॅरिफचा (करवाढीचा) मोठा फटका बसला आहे. अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के आयात कर लागू केल्याने तिरुप्पूरमधील अनेक कापड उत्पादकांनी उत्पादन थांबवले आहे, तर इतर कंपन्या पर्यायी मार्गांचा विचार करत आहेत, असं वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे.

तिरुप्पूर, ज्याला हिंदुस्थानचे ‘निटवेअर हब’ म्हणून ओळखले जाते, येथील वस्त्रोद्योग हा देशाच्या निर्यात क्षेत्रातील महत्त्वाचा हिस्सा आहे. तिरुप्पूर आणि आसपासच्या क्षेत्रातून होणारी एकूण वार्षिक निर्यात सुमारे 45,000 कोटी रुपये आहे. यापैकी 30 टक्के म्हणजेच 12,000 कोटी रुपयांची निर्यात अमेरिकन बाजारपेठेत होते. तिरुप्पूर निर्यातक संघटनेचे (टीईए) अध्यक्ष के. एम. सुब्रमण्यन यांनी सांगितले की, या करवाढीमुळे सुमारे 6,000 कोटी रुपयांचा व्यवसाय प्रभावित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या संकटाच्या पार्श्वभूमीवर तिरुप्पूरमधील काही कंपन्या आता नव्या बाजारपेठांचा शोध घेत आहेत. हिंदुस्थान आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे या कंपन्यांना ब्रिटनच्या बाजारपेठेकडे आशेने पाहता येत आहे. यामुळे काही प्रमाणात नुकसान भरून निघण्याची अपेक्षा आहे.