
कुत्रा हा इमानी प्राणी असतो. मालकाशी असलेलं इमान तो जीव गेला तरी सोडत नाही. अशाच एका इमानदार कुत्र्याच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या मालकाने चक्क त्याचं मंदिर उभारलं आहे.
मुथू असं या 82 वर्षांच्या वृद्ध माणसाचं नाव आहे. मुथू हे एक निवृत्त सरकारी कर्मचारी आहे. ते तमिळनाडू येथील शिवगंगाच्या मनमदुराई या गावात राहतात. मुथू यांचा कुत्रा टॉम हा गेल्या वर्षी आजारपणामुळे मृत्यू पावला.
त्याच्या जाण्याने व्यथित झालेल्या मुथू यांनी त्यांच्या शेतात त्याचं मंदिर उभारलं. ते म्हणतात की, टॉम 2010पासून माझ्याकडे होता. तो माझ्या मुलापेक्षाही जवळचा होता. 2021मध्ये मी त्याला गमावलं. त्यामुळे मी त्याची मूर्ती तयार करून त्याचं मंदिर उभारलं आहे, असं मुथू यांचं म्हणणं आहे.
मुथू यांना येणाऱ्या पिढ्यांनाही माणूस आणि प्राणी यांच्यातल्या भावबंधांची माहिती द्यायची आहे. त्या हेतूनेही त्यांनी मंदिर उभारलं आहे. माझ्या तीन पिढ्यांमध्ये सगळ्यांना कुत्रे आवडत. मी कधीच त्यांना माझ्या घरातला पाळीव प्राणी म्हणून वागवलं नाही. ते माझ्यासाठी माझ्या मुलाइतकेच प्रिय होते, असंही मुथू यांचं म्हणणं आहे.


























































