
एकीकडे समुद्रात माशांची आवक घटलेली असताना आता चक्क नळाद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्यातून छोटी जिवंत कोलंबी मासे येण्यास सुरुवात झाली असल्याची घटना अलिबाग तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. नळाच्या पाण्याद्वारे येणाऱ्या या कोलंबी माशामुळे ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत असून आधीच पंधरा दिवसाने येणारे पाणी आणि त्यात नळाच्या पाण्यातून येणारी कोलंबी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा हा प्रश्न ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देऊन सोडविणे गरजेचे आहे.
अलिबाग शहराला लागून असलेल्या खंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक गेली अनेक वर्षे पाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. येथील ग्रामस्थांना दहा ते पंधरा दिवसांनी एकदा एमआयडीसीचे पाणी ग्रामपंचायतीमार्फत दिले जाते. नळाद्वारे आलेले पाणी ग्रामस्थांना साठवून ठेवावे लागत आहे. मात्र आता तर येणाऱ्या पाण्यामधून जिवंत छोटी कोलंबी येण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज दहा दिवसांनी पाणी आल्याने महिला वर्गाने पाणी भरण्यास सुरुवात केली. दहा दिवसांनी पाणी येत असल्याने महिला वर्गाला पुढील दहा दिवसांच्या पाण्याचे नियोजन करावे लागते. मात्र आज आलेल्या पाण्यात चक्क जिवंत कोलंबी आल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. आधीच खंडाळा ग्रामस्थांच्या पाचवीला पाणी टंचाई पुजलेली आणि त्यात मासळीमय पाणी येऊ लागल्याने संतापाची लाट पसरू लागली आहे. त्यामुळे आमच्या या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी महिला वर्गातून जोर धरत आहे.


























































