भाजप नेत्याच्या नातीच्या लग्नात हजारोंची उपस्थिती, कोरोना गाइडलाइनला केराची टोपली; व्हायरल व्हिडिओनंतर सरकारला जाग

corona-bjp-enjoy-party

गुजरातमध्ये कोरोना संक्रमण वेगानं वाढत असल्याचे समोर आले असून 4 मोठ्या शहरांमध्ये नाइट कर्फ्यू लागू करण्यात आले आहे. तर राज्यात भाजप (BJP)चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री यांच्या कांति गामित यांच्या नातीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत हजारों लोक गरबा गातांना आणि खेळताना दिसत आहेत. तर सरकारकडून देण्यात आलेल्या कोरोनाच्या संदर्भातील कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाईन) पाळण्यात आली नव्हती असे स्पष्ट दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन न केल्याने भाजप नेते आणि तापी जिल्ह्याच्या निजार विधानसभा मतदारसंघातील माजी आमदाराच्या नातीच्या लग्न समारंभावरून विवाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी व्हिडीओ पाहिल्यावर तपासाचे आदेश दिले आहेत. तर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी माजी मंत्री कांति गामित यांना पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या 2 लाख 10 हजारच्या पुढे गेली आहे. अहमदाबाद आणि सूरत सह चार मोठ्या शहरांमध्ये नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे नेतेच सरकारच्या कोरोना गाइडलाइनला केराची टोपली दाखवताना दिसत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील होणार कारवाई

कांति गामित यांच्या नातीच्या लग्नसमारंभाचे आयोजन तापी जिल्ह्यातील डोसवाडा गावात करण्यात आले होते. ज्यामध्ये 6,000 अधिक लोक गरबा खेळताना आणि आसपास उभे असल्याचे दिसत आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुजरात सरकार सामान्य नागरिकांकडून मोठा दंड वसूल करत आहे. मात्र भाजपचे नेतेच नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. अशात जिल्हा प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी सूरत रेंज आयजीपी राजकुमार पांडियन यांच्याकडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तर तापीच्या एसपींनी देखील तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी सांगितले की व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या सर्व लोकांविरोधात तक्रार दाखल होईल, तसेच कार्यक्रमावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी पाऊले न उचलल्याने त्यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या