
तारापूर एमआयडीसीतील ‘गॅलेक्सी’ स्फोटातील मृताच्या अंत्यसंस्कारासाठी गावी निघालेल्या सात जणांना पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले होते. मात्र, याबाबत माहिती मिळताच शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांनी राजापूर पोलिसांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर या सर्व नातेवाईकांची सुटका झाली असून मदतीला धावलेल्या शिवसेनेचे त्यांनी आभार मानले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील गॅलेक्सी कारखान्यात मंगळवारी सकाळी स्फोट झाला. यात तीन कामगारांचा मृत्यू झाला. त्यापैकी मृत झालेले विजय सावंत बोईसर पूर्व भागातील पास्थळ गावात पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलासोबत राहात होते. त्यांचे मूळ गाव सावंतवाडी, कलंबिस्त आहे. मयत सावंत यांचे पार्थिव गावी सावंतवाडी येथे घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्ससह त्यांची पत्नी, मुलगा व इतर दोन अशी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त अन्य 7 जण दुसऱ्या वाहनाने गावी निघाले होते. मात्र, त्यांच्याकडे परवानगी नसल्याने कुडाळ, सावंतवाडी येथे मंगळवारी सकाळी पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात पाठवले होते. याची माहिती मिळताच रात्री 9 वाजता शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांच्या मध्यस्थीनंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.


























































