निवडणुकीआधीच आघाडीत बिघाडी…राष्ट्रवादीचे तारिक अन्वर काँग्रेसमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप चहूबाजूंनी होत असताना या करारात घोटाळा झाला असेल असे वाटत नाही. मोदींच्या हेतूबद्दल शंका घेता येणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यामुळे संतापून राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले पक्षाचे संस्थापक खासदार तारिक अन्वर यांनी आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने राष्ट्रवादीला ‘दे धक्का’ केल्याने आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्दय़ावरून शरद पवार, तारिक अन्वर व पी. ए. संगमा या तिघांनी 1999 मध्ये बंड करत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नव्या पक्षाच्या स्थापनेनंतरही सत्तेसाठी राष्ट्रवादीने लगेचच स्वाभिमान गुंडाळून मनमोहन सिंगांच्या यूपीए सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व महाराष्ट्रातील काही जिह्यांपुरतेच असल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवारांच्या मैत्रीमुळे काँग्रेसमध्ये अजूनही पवारांबाबत संशयकल्लोळ आहे. शरद पवारांनी अडचणीत आलेल्या मोदींची कड घेणारे विधान केल्याने संतापलेल्या तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीचा व खासदारकीचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने तारिक अन्वर यांचे राजकीय सत्तेचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

राष्ट्रवादीत पवार एकटेच…
राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांमध्ये शरद पवार, तारिक अन्वर व पी. ए. संगमा हे त्रिकूट महत्त्वाचे होते. यापैकी संगमा यांचे निधन झाले तर अन्वर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या संस्थापक त्रिकुटापैकी पवार एकटेच पक्षात उरले आहेत.

अन्वर यांच्यावर टाकणार महत्त्वाची जबाबदारी
राष्ट्रवादीला खिजवण्यासाठी काँग्रेस तारिक अन्वर यांची काँग्रेसच्या सरचिटणीपदी नियुक्ती करण्याची शक्यता असून अन्वर यांना उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता काँग्रेसमधील सूत्रांनी वर्तवली. काँग्रेसचे सध्याचे यूपी प्रभारी गुलाम नबी आझाद यांच्या कार्यशैलीवर राहुल नाराज असल्याची चर्चा आहे.

summary- tariq anwar joins congress