…तर क्रिकेटपटू मोईन अली दहशतवादी बनला असता, तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त ट्वीट

बांग्लादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी इंग्लंडचा क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या मोईन अली (Moeen Ali)याच्याबाबत वादग्रस्त ट्वीट केले आहे. यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

‘इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मोईन अली हा क्रिकेट खेळत नसता तर सिरियामध्ये जाऊन तो आयएसआयएसमध्ये जॉईन झाला असता’, असे ट्वीट तस्लीमा नसरीन यांनी केले. यानंतर सोशल मीडियावर तस्लीमा नसरीन यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यानेही तस्लीमा नसरीन यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘तुम्ही ठिक आहात ना? मला नाही वाटत तुम्ही ठिक आहात?’, असे ट्वीट जोफ्रा आर्चर याने केले आहे. तसेच तुमच्या या ट्वीटवर कोणीही हसत नाहीय. तुम्ही देखील नाही. तुम्ही किमान हे ट्वीट हटवू शकता, एवढे तरी तुम्ही करू शकता, असेही आर्चरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. आर्चरसह सोशल मीडियावरील अनेकांनी नसरीन यांच्या या ट्वीटवर टिका केली आहे.

‘त्या’ विधानानंतर केले ट्वीट

दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या मोईन अली याने आपल्या जर्सीवरून अल्कहोलच्या ब्रँडचा लोगो हटवावा अशी मागणी केली होती. यानंतर तल्सीमा नसरीन यांनी हे वादग्रस्त ट्वीट केले होते. परंतु चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी नंतर हा दावा फेटाळून लावला आणि इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूकडून अशी कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.

नसरीन यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, वाद वाढल्यानंतर तस्लीमा नसरीन यांनी हे ट्वीट व्यंगात्मक होते असे स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझा द्वेष करणाऱ्यांना हे माहिती असायला हवे की मोईन अली याच्यावर केलेले ट्वीट एक व्यंग होते. पण त्यांनी मला त्रास देण्यासाठी याचा एक मुद्दा बनवला, कारण मी मुस्लीम समाजाला सेक्यूलर बनवण्यास आणि इस्लामीक धर्मांधतेचा विरोध करते. मानवतेचे हेच मोठे दुर्भाग्य आहे की महिला समर्थक वामपंथी, महिला विरोधी इस्लामिस्टचे समर्थन करतात’, असे ट्वीट तस्लीमा नसरीन यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या