
कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशासह परदेशातही पोहोचला आहे. या वादावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिली होती. त्यात प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरिन यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
तस्लीमा यांनी एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाला यासंबंधी एक मुलाखत दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिजाब हा महिलांना सेक्स ऑब्जेक्ट बनवतो. एखाद्या धर्मनिरपेक्ष देशातल्या एका शैक्षणिक संस्थानाला आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक सेक्युलर ड्रेस कोड अनिवार्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर या संस्था तुम्हाला तुमची धार्मिक ओळख घरीच ठेवा, असं सांगत असतील तर त्यात काहीही चूक नाही. शाळेत धार्मिक कट्टरता, कट्टरवाद आणि अंधश्रद्धेला जागा असू शकत नाही. शाळांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य, लैंगिक समानता, उदारमतवाद, मानवता, वैज्ञानिक सिद्धांत यांचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं नसरीन यावेळी म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, हिजाब, बुरखा, नकाब यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे स्त्रीला उपभोग्य वस्तूरुपात बदलणं. जरी महिलांना पाहून जे पुरुष लाळघोटेपणा करतात, त्यांच्यापासून लपण्याची गरज असते. तरीही ही प्रथा अतिशय अपमानजनक आहे. या प्रथेला लवकरात लवकर बंद केलं गेलं पाहिजे, असं नसरीन यांनी स्पष्ट केलं आहे.
हिजाब हा मुस्लीम धर्माशी संबंधित आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या की, हिजाब आणि इस्लाम एकमेकांशी संबंधित आहेत किंवा नाही, हा मुद्दा नसून मुळात सातव्या शतकात बनलेले कायदे 21 व्या शतकात पाळायची गरज आहे का, हा आहे. हिजाब किंवा बुरखा ही एखाद्या महिलेची आवड कधीच नसतील, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तो एखाद्याच्या व्यक्तिमत्वाच्या ओळखीचा अविभाज्य घटक होऊच शकत नाही, असंही नसरीन यांनी स्पष्ट केलं आहे.



























































