
सामना ऑनलाईन ।मुंबई
मुंबई शहर आणि उपनगरात असलेल्या टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना मे महिन्यात महागडय़ा विजेचा भार सोसावा लागणार आहे. टाटा पॉवरकडे सध्या 800 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली जात असून उन्हाच्या चटक्यामुळे मे महिन्यात ती 925 मेगावॅटपर्यंत जाणार आहे. या वाढीव विजेसाठी टाटा पॉवरने अल्पकालीन वीज खरेदी करार केला असून त्याचा प्रतियुनिटचा दर साडेपाच रुपये असणार आहे. त्याला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजुरी दिल्याने हा वाढीव भार ग्राहकांवर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.
उन्हाळय़ातील वाढणारा तापमानाचा पारा आणि उकाडय़ामुळे एसी, पंखे, कुलर सुसाट सुटणार असल्याने मुंबईत सर्वांचीच विजेची मागणी वाढणार आहे. सध्या टाटा पॉवरच्या प्रतियुनिट विजेचा सरासरी दर सुमारे सवाचार रुपये एवढा आहे. मात्र वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवर मे महिन्यात मित्तल प्रोसेसर लिमिटेडकडून 4.28 पैसे प्रतियुनिट दराने 25 मेगावॅट, जेएडब्ल्यू पॉवर टेडिंगकडून 5.45 रुपये दराने 50 तर टाटा पॉवर टेडिंग कंपनीकडून 5.54 रुपये युनिट दराने वीज घेणार आहे. याचा भार टाटाच्या सर्वच सात लाख ग्राहकांवर पडणार आहे.





























































