टाटा है तो विश्वास है! 20 वर्षांनी आयपीओ बाजारात; खरेदीसाठी तुटून पडले लोक

गुंतवणूकदारांची प्रतीक्षा अखेर संपली. तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूहाचा आयपीओ बाजारात दाखल झाला. बाजार उघडण्याच्या तासभर आधीच टाटाच्या आयपीओ खरेदीसाठी गुंतवणूकदार अक्षरशः तुटून पडले. सकाळी 10 वाजता बाजार उघडताच तासाभरातच टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ पूर्ण भरला.

या आयपीओअंतर्गत कंपनीने 60,850,278 शेअर्ससाठी बोली मागवल्या होत्या. सकाळी 10 वाजून 48 मिनिटांपर्यंत 6,04,26,120 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाल्या. या आयपीओतून कंपनी तब्बल 3042.51 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओसाठी 475-500 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येईल. या आयपीओअंतर्गत लॉट साईज 30 शेअर्सचा आहे आणि प्राईस बँडनुसार गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 15 हजार रुपये गुंतवावे लागतील.

5 आयपीओ उघडले

आज बुधवारी शेअर बाजारात टाटा टेकसह एकूण 5 आयपीओ बाजारात दाखल झाले. 24 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओंमध्ये गुंतवणूक करता येईल. टाटा टेक्नॉलॉजीज, फ्लेअर रायटिंग, गाधार ऑइल रिफायनरी, फेडबॅक फायनान्शियल सर्व्हिसेस आणि रॉकिंग डीलर सर्क्युलर या कंपन्यांचे आयपीओ आज उघडले.

ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद

टाटा समूहाच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. या इश्यूचा ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम सुमारे 350 रुपये प्रति शेअर इतका आहे. अशा परिस्थितीत ग्रे मार्केट प्राइसनुसार शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांना बक्षीस मिळेल.

  • आयपीओ तारीख     22 ते 24 नोव्हेंबर
  • प्राइस बँड                475 ते 500 रु. प्रति शेअर
  • इश्यू साईज             3042.5 कोटी रुपये
  • लॉट साईज             30 शेअर्स
  • किमान गुंतवणूक     15 हजार रुपये