
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 जानेवारी रोजी टाटा समूहाच्या डिजिटल पेमेंट ऍपला म्हणजेच ‘टाटा पेमेंट’ला एग्रीगेटर परवाना मंजूर केला आहे. म्हणजे आता टाटा कंपनी ई- कॉमर्स व्यवहार करू शकते. याचा अर्थ येत्या काळात ‘गुगल पे’प्रमाणे ‘टाटा पे’ ऍप मार्केटमध्ये येऊ शकते.
टाटा पेमेंट हे टाटा समूहाच्या उपकंपनी टाटा डिजिटलद्वारे चालवले जाणार आहे. कॅशफ्री, गुगल पे आणि अन्य कंपन्यांप्रमाणे ‘टाटा पे’ला दीर्घ प्रतीक्षेनंतर परवाना मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेमेंट एग्रीगेटर लायसन्समुळे आता टाटा त्यांच्या उपकंपन्यांमधील सर्व ई-कॉमर्स व्यवहारांना सक्षम बनवू शकतो, ज्यामुळे समूहाला निधीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत होणार आहे.
सध्या बाजारात गुगल पे, फोन पे, पेटीएम असे लोकप्रिय ऍप आहेत. गुगल पे हे गुगलने विकसित केलेले इंडियन डिजिटल पेमेंट सिस्टम ऍप आहे. हे ऍप सर्वाधिक वापरल्या जाणाऱया पेमेंट ऍप्सपैकी एक आहे. फोन पे हे फ्लिपकार्टद्वारे विकसित केलेले इंडियन डिजिटल पेमेंट सिस्टम ऍप आहे. त्या खालोखाल हिंदुस्थानात पेटीएम ऍप वापरले जाते. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी पेटीएमचा वापर केला जाऊ शकतो.























































