
सामना प्रतिनिधी । नगर
कर्जत येथील तौसिफ शेख याला आत्मदहनास प्रवृत्त केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. ट्रस्टी जहाँगिर इब्राहीम शेख (रा. चेंबूर, मुंबई), तौसिफबरोबर आलेले अमजद नबी शेख (रा. कर्जत), विशाल दिलीप काकडे (रा. भांडेवाडी, ता. कर्जत), युनूस दस्तगिर कुरेशी (रा. कुरेशीगल्ली, कर्जत), अमीन रशीम झारेकरी (रा. कर्जत) व पप्पू मोइदीन (रा. कापरेवाडी, ता. कर्जत) या सहा जणांविरोधात हा गुन्हा नोंदविला आहे. पोलीस कर्मचारी रवींद्र घुंगासे हे फिर्यादी आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे तपास करत आहेत.
कर्जत मधील मुख्य रस्त्यावरील मुस्लिम ट्रस्ट पिर दावल मलिक देवस्थानच्या जमीनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ काढा अन्यथा आत्मदहन केले जाईल असा इशारा मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते तौसिफ हमीम शेख यांनी दिला होता. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. क्षणभरात आगीने पेट घेतला. त्यामुळे एकच पळापळ सर्वत्र झाली. या ठिकाणी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार उमेश दारुणकर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तौसिफ हमीम शेख 80 टक्के भाजले होते.
























































