टॅक्सी ड्रायव्हर तरुणी घेणार लंडनमध्ये उच्च शिक्षण!

तीन वर्षांपूर्वी वडिलांचा अपघात झाला. कर्तापुरुष घरी बसल्यामुळे तिने टॅक्सी चालवत कुटुंबाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. मात्र, पदवी शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती तिला स्वस्थ बसू देईना. पदवी पूर्ण केल्यावर परदेशातून उच्च शिक्षण घेण्यासाठी तिने धडपड सुरू केली आणि त्यात ती यशस्वीही झाली. लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स येथे ‘इंटरनॅशनल मार्केटिंग ऍण्ड मॅनेजमेंट’ या विषयात दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नुकतीच ती लंडनला रवाना झाली.

रेगुंठा या गडचिरोली जिह्यातील अत्यंत छोटय़ा दुर्गम खेडय़ात टॅक्सी ड्रायव्हर म्हणून किरण कुर्मावार काम करत होती. एकीकडे कुटुंब सांभाळताना दुसरीकडे शैक्षणिक ओढीने तिने हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठामधून दुरस्थ माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात तिची अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या विशाल ठाकरे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तिने पदव्युत्तर शिक्षण परदेशी विद्यापीठातून घेण्याचे स्वप्न पाहिले.

मदतीसाठी सारे सरसावले

किरणला परदेशात जाण्यासाठी मोठी अडचण आर्थिक मदतीची होती. किरणचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांचे हात कामाला लागले. यात दोघा वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी सरकारदरबारी ही गोष्ट पोहोचवली आणि पुढचा मार्ग अधिक सुकर झाला.

शिवसेनेची खंबीर साथ

शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनीही किरणचा विषय सभागृहात मांडला. नक्षलग्रस्त भागातून एक तरुणी विधायक मार्गाने शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहे आणि सरकार म्हणून आपण ती जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी सरकारला त्यांनी विनंती केली. त्यामुळेच तिला परदेशी शिष्यवृत्तीसाठी आर्थिक मदत मंजूर झाली. त्याचबरोबर परदेशात जाण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे, व्हिसा पासपोर्ट मुख्य म्हणजे लंडनचा प्रवास खर्च आमदार सचिन अहिर यांनी कुठेही गाजावाजा न करता कर्तव्यभावनेने केला. सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी किरणला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही मोलाचे सहकार्य केले.