
सामना ऑनलाईन, फरीदाबाद
नवजात बालकाची त्याच्या आईसह संपूर्ण कुटुंब डोळ्यात तेल घालून काळजी घेत असतं. बाळाला काय द्यावे आणि काय देऊ नये हे डॉक्टरही नीट समजावून सांगत असतात. असं सगळं असूनही एका कुटुंबाने त्यांच्या घरात जन्माला आलेल्या बाळाला दुधाऐवजी चहा कॉफी पाजली. यामुळे त्याच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सपना नावाच्या महिलेच्या मुलीला बीके रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हे बाळ अवघ्या 4 दिवसांचं होतं. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा कुटुंबियांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की या बाळाला कुटुंबियांनी चहा-कॉफीव्यतिरिक्त दही देखील दिलं होतं. डॉक्टरांनी या बाळाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र बुधवारी सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाला.

























































