
सामना प्रतिनिधी। राहुरी
राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत संप पुकारण्यात आला असून मंगळवारी पहिल्याच दिवशी राहुरी तालूक्यातील शासकीय कर्मचारी व शिक्षकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन छेडले.
सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी सुरु करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे या मागण्यासाठी ७ ते ८ ऑगस्ट असा तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. शिक्षकांच्या वतीने वरील मागण्यांसह राज्य सरकारचे शिक्षण विरोधी धोरणे उलथून टाकणे, अतिरिक्त शिक्षकांचे लगतच्या शाळेस समायोजन करणे, विना अनुदानीत शाळांना १०० टक्के अनुदान या मागण्यांसाठी मंगळवारी शाळा बंद ठेऊन सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
राहुरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात केलेल्या ठिय्या आंदोलनात तलाठी संघटना, कृषी संघटना,महसूल संघटना, शिक्षक संघटना, तसेच सरकारी व निमसरकारी कर्मचारी सामील झाले होते.तहसीदार अनिल दौंडे यांना मागणीचे निवेदन देवुन ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
summary…teachers protest infront tehsil office at rahuri



























































