
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात होणारी जनगणना पार पडली नाही. कोरोनामुळे जनगणनेच्या कामातून शिक्षकांची तात्पुरती सुटका झाली असली तरी आता येणाऱया एप्रिल-मे महिन्यात शिक्षकांच्या डोक्यावर जनगणना कामाची टांगती तलवार आहे. मात्र या काळात सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार असून राज्याच्या शिक्षणमत्र्यांनीही यंदा उशिराने म्हणजेच मे महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. जनगणना आणि बोर्डाच्या परीक्षा एकाच वेळेस आल्यास शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागेल.
अद्याप तरी जनगणना कामाच्या कोणत्याही सूचना केंद्र सरकारकडून आलेल्या नाहीत. गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये जनगणना होणार होती, मात्र लॉकडाऊनमुळे ती होऊ शकली नाही. त्याआधी 2011 मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यानंतर आजतागत जनगणना झाली नसल्याने यंदाच्या वर्षी ती पार पडण्याची पूर्ण शक्यता असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. जनगणनेच्या कामात शिक्षकांचे सुमारे 45 दिवस जाणार आहेत. राष्ट्रीय कर्तव्य असल्याने हे काम शिक्षकांना करावेच लागणार आहे, मात्र तरीही दहावी, बारावीच्या शिक्षकांना या कामातून सूट मिळावी अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने जालिंदर सरोदे यांनी केली आहे.
शिक्षकांवर मतदार याद्या पुनर्रिक्षणाचीही जबाबदारी
राज्यात 15 जानेवारीपर्यंत मतदार याद्या पुनर्रिक्षणाचे काम सुरू असून या कामाची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. मुंबईतील एका खासगी शाळेतील तब्बल 27 शिक्षकांना हे काम लावण्यात आले आहे. सध्या शाळा ऑनलाइन सुरू असल्या तरी शाळांमधून मोठय़ा प्रमाणावर शिक्षकांना या कामासाठी घेण्यात आल्याने शाळांचे वेळापत्रक कोलमडल्याचेही सरोदे म्हणाले.























































