नागपुरात बारावी सायन्सचे दोन पेपर फुटले; शिक्षकाने व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका केली व्हायरल, परीक्षा मंडळाजवळच्या केंद्रावर घडला प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात दहावी-बारावी परीक्षेचे सत्र सुरू असून, यादरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार सुरू असल्याचे उघडकीस येत आहे. मात्र, यावर्षी पहिल्यांदा बारावीच्या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन विषयांचे पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागपूरच्या मध्यवर्ती भागात परीक्षा मंडळाच्या जवळच असलेल्या सेंट उर्सूला शाळेत हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात शिक्षकाने प्रश्नपत्रिका समाजमाध्यमावरील व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल केल्याने शिक्षण विभागात संताप व्यक्त होत आहे.

सेंट उर्सूला शाळेतील परीक्षा कक्षात कर्तव्यावर असलेल्या शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे ही बाब चव्हाटय़ावर आली. या प्रकरणात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ज्या विद्यार्थिनींना व्हॉट्सअ‍ॅपवर या प्रश्नपत्रिका पोहोचल्या होत्या, त्या विद्यार्थिनींची  पोलीस चौकशी करत आहेत. सोबतच पेपर फोडणाम शिक्षकाचीही चौकशी केली जात आहे. या दोन्ही प्रश्नपत्रिका राज्यातील इतरही जिह्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेच्या अगोदरच पोहोचल्या असण्याची शक्यता आहे. त्या दिशेनेही पोलीस चौकशी करत आहेत. या दरम्यान शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

परीक्षा केंद्रावरील विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने पर्यवेक्षकेला विद्यार्थिनीच्या हालचालींवर संशय आला. ती विद्यार्थिनी तिसऱ्यांदा प्रसाधनगृहात जाऊन परत पेपर सोडवण्यासाठी आली. या विद्यार्थिनीची अन्य महिला शिक्षिकेच्या मदतीने झडती घेतली असता तिच्याकडे भ्रमणदूरध्वनी सापडला. तो तपासला असता एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एक प्रश्नपत्रिका संच आलेला होता. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच या ग्रुपवर व्हायरल झाल्याचे समोर आले. त्याच व्हॉट्सअ‍ॅप गुपमधल्या संदेशांवर प्रश्नांची उत्तरेदेखील पाठवण्यात आली होती. यामुळे केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना परीक्षा केंद्रावर पाचारण केले.

पोलिसांकडून चौकशी सुरू

पोलिसांनी संबंधित विद्यार्थिनीची चौकशी केली असता तिने मैत्रिणीचे नाव सांगितले. दोघींचीही चौकशी केली असता खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती मिळाली. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरून आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवरील संदेशावरून पोलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला. हा पेपर आतापर्यंत किती जणांपर्यंत पोहोचला तसेच या रॅकेटमध्ये किती जण सहभागी आहेत? याची माहिती पोलीस कसून चौकशी करत आहेत.