
रायगड जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभाग हा नेहमीच चर्चेत असतो. बोगस सही प्रकरण, आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रकरण, शिक्षक बदली यासारखी प्रकरणे गाजलेली आहेत. आंतरजिल्हा बदलीमध्ये कार्यमुक्त करण्यासाठी 5 सप्टेंबर रोजी मागितलेल्या लाचेप्रकरणी सहाय्यक अधिकारी अशोक कुकलारे व दोन प्राथमिक शिक्षकांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने लाच घेताना अटक केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे.
जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा सर्व कार्यभार हा जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत चालू असतो. शिक्षक बदली हा विषय म्हणजे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शिक्षकांची जिल्ह्यात, आंतरजिल्हा अशा बदल्या होत असतात. यावेळी शासनाच्या निर्णयानुसार शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने बदली व समायोजन प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया पार पडताना शिक्षकांनी गोंधळ घातला होता. शिक्षकांचा रोष पत्करून सत्ताधारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन यांनी ही प्रक्रिया उत्तमरीत्या पार पाडली.शिक्षक बदली व समायोजन प्रक्रिया ही कोणताही आर्थिक व्यवहार न होता पार पडली होती असे चित्र तयार झाले होते. मात्र शिक्षण विभागातील काही महत्वाचे अधिकारी भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याचे अशोक कुकलारे यांच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी 21 उपशिक्षकांचे आंतरजिल्हा बदली प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात कनिष्ठ कारकून अमोल ठाकूर याला वर्षभरापूर्वी अटक करण्यात आली आहे. मात्र यातील मुख्य आरोपी आजही मोकाटच फिरत आहेत. बोगस सही प्रकरणाच्या वेळीही आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात होते.
जिल्हा परिषदेच्या बोगस सही प्रकरणाचा तपास अजूनही अपूर्ण आहे. तर पुन्हा एकदा अधिकारी अशोक कुकलारे व प्राथमिक शिक्षक संजय विट्ठल ढमाले, निवृत्ति नींबा भूले यांच्यामुळे आंतरजिल्हा बदलीमध्ये आर्थिक घेवाण देवाण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात भ्रषाचार झाल्याचे बोलले जात आहे.

























































