शालेय नियोजनानुसार वार्षिक परीक्षा घेऊ द्या, शिक्षक परिषदेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय शिक्षण विभागाने 24 मार्च रोजी जीआर काढून एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या तसेच वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱया आठवडय़ात घेण्याविषयीच्या सूचना जारी केल्या. मात्र यामुळे शाळांचे नियोजन कोलमडले आहे. बऱयाच शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू असून त्या 10 एप्रिलपर्यंत संपणार आहेत. त्यामुळे शालेय नियोजनानुसार वार्षिक परीक्षा घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्यासाठी शाळांना वेळ हवा असतो. अनेक शाळांनी निकालाच्या तारखा यापूर्वीच घोषित केल्या आहेत. त्यानुसार पालकांनी गावी जाण्याचे आरक्षणही केले आहे. शासन निर्णयानुसार एप्रिलच्या तिसऱया आठवडय़ात परीक्षा घेतल्यास शाळांबरोबरच पालकांचेही नियोजन कोलमडणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांना त्यांच्या नियोजनानुसार परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी तसेच चालू शैक्षणिक वर्ष 1 मे रोजी संपणार असल्याची घोषणा करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

कला संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱया शासकीय रेखाकला परीक्षांसाठी (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी आता 31 मार्चपर्यत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरू शकतात.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. कोरोनामुळे यंदा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने जाहीर केला. मात्र त्याला विरोध झाल्यानंतर आता राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. दहावीच्या परीक्षेनंतर 9 ते 12 एप्रिलदरम्यान परीक्षा होणार असून नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. इंटरमिजिएट परीक्षेत ग्रेड मिळविणाऱया विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात. ही परीक्षा देण्यासाठी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेला अर्ज करण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती; परंतु आता ही मुदत वाढविण्यात आली असून विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे.