
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या झालेल्या धक्कादायक पराभवानंतर बीसीसीआय खडबडून जागे झाले आहे. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता मालिका वाचवण्याची नामुष्की टीम इंडियावर ओढावली आहे. त्यामुळे दुसऱया कसोटी सामन्यासाठी संघात जोश भरण्यासाठी आवेश खानची निवड करण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
हिंदुस्थानला गेल्या 31 वर्षांच्या कालखंडात अद्याप दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दिग्गज खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेला संघ यंदा इतिहास बदलेल अशी आशा होती, मात्र पहिल्याच कसोटी सामन्यात हिंदुस्थानला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवासह मालिका गमावण्याची टांगती तलवार सध्या हिंदुस्थानी संघावर आहे. त्यामुळे बीसीसीआयने कसोटी संघात काही फेरबदल केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिका विजयामध्ये आवेश खानचा मोलाचा वाटा होता. दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी संघाची घोषणा करताना बीसीसीआयने शमीला कसोटी संघात स्थान दिले होते, मात्र मोहम्मद शमीचे कसोटी मालिकेत खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचेही निवेदनात म्हटले होते. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने शमीला फिटनेस प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला. त्यामुळे शमीच्या जागी आवेश खानला संघात स्थान देण्यात आले आहे.
दुसऱया कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, के. एस. भरत (यष्टिरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.






























































