टीम इंडियाचा माजी खेळाडू डेविड जॉन्सनने संपवले जीवन, क्रिकेट विश्वाला धक्का

टी 20 वर्ल्ड कपचे सामने फॉर्मात सुरू असताना क्रिकेटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा क्रिकेटर डेव्हिड जॉन्सन यांचे निधन झाले आहे. खासगी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून डेविड जॉन्सन यांनी आत्महत्या केली आहे. डेविड जॉन्सन यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.

हिंदुस्थानचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे याने डेविड जॉन्सन यांच्या निधनाबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. ‘क्रिकेटमधील माझा सहकारी डेविड जॉन्सन याच्या निधनाची बातमी दु:खद आहे. बेन्नी (डेविड जॉनसन) तू या जगातून लवकर निघून गेलास’, असं म्हणत डेविड यांच्या कुटुंबाप्रती अनिल कुंबळे यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

डेविड जॉन्सन यांनी दोन कसोटी सामने खेळले होते. 10 ऑक्टोबर 1996 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिल्लीतील कसोटी मॅचमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यानंतर त्याला परत संधी मिळाली नाही. मात्र देशांतर्गत सामने आणि लीग क्रिकेटमध्ये खेळत होते.