
मंगळवारी पहिल्या वन डे लढतीत इंग्लंडचा पालापाचोळा करीत शानदार विजय मिळवणाऱया टीम इंडियाला आपल्या कामगिरीचे पारितोषिक लगेचच मिळाले आहे. या मोठय़ा विजयामुळे आता कसोटी, टी-20 क्रिकेटपाठोपाठ वन डे क्रिकेट रँकिंगमध्येही हिंदुस्थानी संघ टॉप थ्रीमध्ये आला आहे.
मंगळवारच्या विजयामुळे वन डे रँकिंगमध्ये 3 रेटिंग गुण मिळवत 108 गुणांसह टीम इंडियाने पाकिस्तानला चौथ्या स्थानावर ढकलत तिसरे स्थान मिळवले आहे. पाकिस्तानचे गुण 105 आहेत. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप थ्रीमध्ये पोहचणारा हिंदुस्थान हा जगातला पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी केनिंग्स्टन ओव्हल मैदानावर जसप्रीत बुमराह नावाच्या वादळापुढे वन डे विश्वविजेता इंग्लंड संघ अक्षरशः पालापाचोळय़ासारखा उद्ध्वस्त होताना दिसला.
तीन वन डे लढतींच्या मालिकेतील पहिल्या लढतीत टीम इंडियाने यजमान इंग्लंडला 10 विकेट्सनी पराभूत करीत जबर झटका दिला. या मोठय़ा विजयामुळे हिंदुस्थानी संघाला आयसीसी वन डे रँकिंगचे 3 गुण मिळाले. या गुणांच्या बळावरच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आपली गुणसंख्या 108 वर नेत चौथ्या स्थानावरून तिसऱया स्थानी मजल मारली. त्यामुळे 106 गुणांसह पाकिस्तान चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. वन डेत 498 या विशाल धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणाऱया यजमान इंग्लंडला 110 या नीचांकी धावसंख्येवर बाद करण्यात सिंहाचा वाटा उचलला तो 19 धावांत 6 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह आणि 31 धावांत 3 विकेट घेणारा मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांनी.
आयसीसी वन डे टॉप 5 रँकिंग
न्यूझीलंड 126 गुणांक
इंग्लंड 122 –
हिंदुस्थान 108 –
पाकिस्तान 105 –
ऑस्ट्रेलिया 101 –
आयसीसी वन डे गोलंदाजी रँकिंग
1) जसप्रीत बुमराह हिंदुस्थान 718
2) ट्रेंट बोल्ट न्यूझीलंड 712
3) शाहीन आफ्रिदी पाकिस्तान 681
4) जोश हेझलवूड ऑस्ट्रेलिया 679
5) मुजीब उर रहमान अफगाणिस्तान 676
बुमराहची नंबर वनवर भरारी
विश्वविजेत्या इंग्लंड संघाविरुद्धच्या पहिल्या वन डेत 19 धावांच्या मोबदल्यात 6 फलंदाज बाद करून जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये सुमारे 17 महिन्यांनंतर टॉपच्या स्थानावर भरारी घेतली आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकले आहे. 2020 मध्ये बुमराहने याच बोल्टला मागे टाकत गोलंदाजी रँकिंगमध्ये टॉपचे स्थान पटकावले होते.
तेव्हा सलग 730 दिवस टॉपवर राहण्याचा पराक्रम त्याने केला होता. हिंदुस्थानचा विश्वविक्रमी कर्णधार कपिलदेव यांच्यानंतर आयसीसीचे नंबर वन रँकिंग मिळवणारा बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराह 71 लढतींत 119 विकेट मिळवत 24.30 च्या सरासरीने टॉपचे स्थान मिळवणारा हिंदुस्थानी गोलंदाज बनला आहे.




























































