
सलग दोन कसोटी पराभवांनी खचलेला हिंदुस्थानी संघ रांचीच्या थरारक विजयामुळे पुन्हा जोशात आला असून आता रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या ऐतिहासिक शतकाने व रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीने संघात नवे चैतन्य संचारले आहे आणि याच जोशाच्या जोरावर रायपूरमध्ये मालिका विजयाचा शो करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. दुसरीकडे आफ्रिकन संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे रायपुरला विजयाचा धूर कोण काढतो, ते खेळपट्टीचे रागरंगच ठरवेल.
2027 च्या विश्वचषकाचे शिल्पकार?
2027 च्या वर्ल्ड कपला अजून 22 महिने शिल्लक आहेत. या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कोहली-रोहित ही जोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. प्रत्येक सामना हे दोघेही ‘आम्ही अजून संपलेलो नाही,’ हे ठसठशीतपणे सांगत आहेत. फिटनेस, फॉर्म आणि आत्मविश्वास या तिन्ही आघाडय़ांवर हे दोघे सध्या अव्वल स्थानी आहेत. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी मतभेदांच्या चर्चा आता ड्रेसिंगरूमपर्यंत पोहोचल्या असल्याच्या कुजबुजी सुरू आहेत. बीसीसीआयला यात मध्यस्थी करावी लागू शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. तरी मैदानात उतरल्यावर कोहली-रोहितची बॅट बोलतेच!
मधल्या फळीचा गोंधळ कायम
पहिला सामना जिंकल्याचा आनंद असला तरी हिंदुस्थानच्या अडचणी संपलेल्या नाहीत. ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर अजूनही स्थिरावताना दिसत नाही. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याची चर्चा आहे. त्यातच के. एल. राहुल सहाव्या क्रमांकावर खेळला, तर वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येक सामन्यात नवा क्रमांक हीच त्याची ओळख बनत चालली आहे. त्यामुळे उद्या तो कोणत्या क्रमांकावर खेळेल हे संघव्यवस्थपानालाही ठाऊक नाही. हर्षित राणाने नवीन चेंडूवर दोन विकेट बाद केले, पण नंतर धावाच धावा दिल्या. आयसीसीच्या नव्या नियमांनुसार (34 षटकांनंतर एकच चेंडू) त्याला अजून जुळवून घ्यावे लागेल. कुलदीप यादवने चार विकेट घेतले, मात्र धावाही तितक्याच दिल्या. तो खूपच महागडा ठरला होता.
आफ्रिकेचा ‘कमबॅक’चा इशारा
11 धावांत तीन विकेट गमावूनही दक्षिण आफ्रिकेने रांचीला दमदार पुनरागमन केले. मार्को यान्सनची वादळी अर्धशतकी खेळी आणि पदार्पणात चमकलेला मॅथ्यू ब्रीझके हे दोघेही धोक्याची घंटा आहेत. यावेळी कर्णधार टेंबा बवुमा आणि फिरकीपटू केशव महाराज परतणार असल्याने आफ्रिकन संघ अधिक मजबूत झाला आहे. रायपूरमध्ये ते संघाला बरोबरी साधून देण्याची क्षमता राखून आहेत.
खेळपट्टीची साथ वेगवान गोलंदाजांना
शहीद वीर नारायणसिंग स्टेडियमची खेळपट्टी वेगवानांना साथ देते, हे इतिहास सांगतो. 2023 मध्ये इथे न्यूझीलंड 108 धावांत गारद झाला होता. ऑस्ट्रेलियालाही येथे टी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळीही वेगवान गोलंदाज ‘खेळ’ रंगवतील, अशी शक्यता आहे.
दुसऱ्या वन डेसाठी संभाव्य अंतिम संघ
हिंदुस्थान- रोहित शर्मा, यशस्वी जैसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, नीतीश कुमार रेड्डी / ऋतुराज गायकवाड, के. एल. राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका – टेंबा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), एडन मार्करम, मॅथ्यू ब्रीझके, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सन, केशव महाराज, कॉर्बिन बॉश, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.





























































