दुसऱ्या वन डेसह मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; अहमदाबादमध्ये आज पुन्हा वेस्ट इंडीजला भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आगळी ऊर्जा घेऊन खेळणारा हिंदुस्थानी क्रिकेट संघ उद्या दुसऱया वन डेसह दोन लढतींची मालिका 2-0 अशी निर्विवादपणे जिंकण्याच्या जबर निर्धाराने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरणार आहे. कर्णधार रोहितच्या धडाकेबाज 60 धावांच्या खेळीसह चहल आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अफलातून फिरकीपुढे पाहुणा वेस्ट इंडीज संघ पहिल्या वन डेत पार अपयशी ठरला होता. त्यामुळे उद्याच्या लढतीत यजमान संघाचे पारडे जाड असणार आहे. त्यातच सलामीवीर के. एल. राहुल पुन्हा खेळण्यासाठी उपलब्ध झाल्याने हिंदुस्थानी फलंदाजी अधिक बळकट होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील आपले अपयश विसरून टीम इंडियाने पहिल्या वन डे लढतीत अफलातून खेळ केला होता. त्यामुळेच पहिला वन डे सामना टीम इंडियाला 6 विकेट राखून सहज जिंकता आला होता. तीच विजयी लय कायम राखण्यासाठी रोहितच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ मैदानात आपली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सलामीला कर्णधार रोहित शर्मासोबत के. एल. राहुल आल्यास ईशान किशनला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र त्याला स्थान मिळाल्यास तो मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो.

विराटच्या 44 व्या शतकाची सर्वांना प्रतीक्षा

माजी कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून गेली काही वर्षे शतकी खेळी पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीत तो आपले 44  वे वन डे  आणि कारकीर्दीतील 71 वे शतक साकारतो का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 14 ऑगस्ट 2019 नंतर विराटला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत शतकी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे त्याचा शतकाचा दुष्काळ अहमदाबादेत संपणार का याची प्रतीक्षा सर्वांना आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सार्वधिक षटकारांचा विक्रम मोडतो का हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. धोनीने हिंदुस्थानात 116 षटकार ठोकले आहेत. रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या वन डेत 116 वा षटकार ठोकत धोनीच्या विक्रमाची बरोबरी  केली होती. आता उद्याच्या दुसऱया लढतीत तो धोनीचा विक्रम मोडू शकतो. विराट कोहली हा या विक्रमाच्या यादीमध्ये रोहितच्या फारच मागे आहे.

शिखर, ऋतुराज, श्रेयसचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

 वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱया एकदिवसीय लढतीपूर्वी हिंदुस्थानी संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. हिंदुस्थानी संघातील प्रमुख फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे बीसीसीआय हदरली होती. हिंदुस्थानचा सलामीवीर शिखर धवन, नवोदित खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांना कोरोना झाल्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाची निवड करायची असा प्रश्न बीसीसीआयपुढे होता.

प्रतिस्पर्धी संघ यातून निवडणार

हिंदुस्थानः रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

वेस्ट इंडीजः कायरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन एलेन, एनक्रुमाह बोनर, डेरेन ब्राव्हो, शामार ब्रुक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ , ब्रॅण्डन  किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श  ज्युनियर.

लढत दुपारी 1.30 पासून सुरू होणार