टीम इंडियाला आणखी एक धक्का, रवी शास्त्रींसोबत आणखी एक ‘दिग्गज’ वर्ल्डकपनंतर साथ सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी टी-20 वर्ल्डकपनंतर हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. शास्त्री मुदत वाढवून मागणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. याच दरम्यान आणखी एका दिग्गजाने वर्ल्डकपनंतर टीम इंडियाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. याबाबत बीसीसीआयलाही माहिती देण्यात आली आहे.

टीम इंडियाचे स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग कोच निक वेब (Nick Webb) हे यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपनंतर संघासोबत दिसणार नाहीत. न्यूझीलंडमध्ये कोरोनामुळे लागलेल्या प्रतिबंधामुळे ते टी-20 वर्ल्डकपनंतर आपला करार वाढवू शकणार नाहीत. निक वेब रे 2019 च्या वर्ल्डकपनंतर हिंदुस्थाच्या संघाशी जोडले गेले होते. त्यांनी शंकर बासू यांना रिप्लेस केले होते. याआधी त्यांनी न्यूझीलंडचा महिला संघ आणि स्थानिक संघ सेंट्रल डिस्ट्रिक्टसोबतही काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही प्रवेश केला होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्येही कसोटी मालिका जिंकली होती.

इंग्लंडमध्ये झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपपासून निक वेब हे हिंदुस्थानच्या संघासोबत आहे. आठ महिने कुटुंबियांपासून दूर राहणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात हिंदुस्थान, बीसीसीआय आणि टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याचे सौभाग्य मला मिळाले. यादरम्यान संघाने बऱ्याच गोष्टी मिळवल्या. आम्ही हरलोही आणि जिंकलोही. सतत आव्हानांचा स्वीकार करत चांगली कामगिरी करणे खास होते, असे ते म्हणाले.

तसेच हा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतु कुटुंबियांना प्राधान्य द्यायलाच हवे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे प्रतिबंध कडक केल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. भविष्यात काय होईल हे माहिती नाही, मात्र टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानच्या संघासाठी लागेल ती मदत करण्यासाठी सज्ज आहे, असेही ते म्हणाले.

IPL 2021 जम्मूच्या खेळाडूची गोलंदाजी पाहून कोहलीही थक्क, पराभव विसरून दिलं ‘खास गिफ्ट’

करार संपणार

रवी शास्त्री 2014मध्ये संचालक म्हणून हिंदुस्थानी संघात दाखल झाले होते. 2016मध्ये हा करार संपुष्टात आल्यानंतर त्यांना एका वर्षासाठी हिंदुस्थानी संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्त केले. 2017मध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर रवी शास्त्री ‘टीम इंडिया’चे पूर्ण काळ प्रशिक्षक बनले. त्या वेळी शास्त्री 2019च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक राहणार होते. मात्र त्यानंतर त्यांचा कार्यकाल 2020च्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत वाढविण्यात आला. गतवर्षी कोरोना महामारीमुळे टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे हा वर्ल्ड कप संपल्यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे.