टीम इंडियाला मिळणार तीन आठवडय़ांची विश्रांती, क्रिकेटपटूंचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी संघ व्यवस्थापनाचा निर्णय

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱयावर आहे. या दौऱयात विराट कोहलीची टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या प्रदीर्घ दौऱयात हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना बराच वेळ बायोबबल अर्थातच जैव सुरक्षित वातावरणात रहावे लागणार आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी हिंदुस्थानी संघाच्या व्यवस्थापनाने टीम इंडियातील क्रिकेटपटूंना दोन मालिकांदरम्यान तीन आठवडय़ांची विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन मालिकांदरम्यान मोठा ब्रेक

हिंदुस्थान – न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून प्रारंभ होईल. या दोन मालिकांदरम्यान टीम इंडियाला तब्बल 42 दिवसांचा ब्रेक मिळणार आहे.

20 दिवसांची मनसोक्त सुट्टी

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडल्यानंतर टीम इंडियातील खेळाडूंना 20 दिवसांची अर्थातच तीन आठवडय़ांची सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी क्रिकेटपटू मनसोक्त एन्जॉय करू शकतात. या दरम्यान ते इंग्लंडमधील आपल्या मित्रांनाही भेटायला जाऊ शकतात. पण 14 जुलै रोजी खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी पुन्हा एकत्र यावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या