टीम इंडियाने रोखला द. आफ्रिकेचा विजयरथ, यजमानांच्या विजयामुळे मालिकेतील आव्हान कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लागोपाठच्या सात पराभवानंतर अखेर टीम इंडियाने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखला. ‘जिंका किंवा मरा’च्या तिसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघाला यजमान हिंदुस्थानने 48 धावा आणि 5 चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह हिंदुस्थानने 5 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची आघाडी 1-2 अशी कमी करून मालिकेतील आव्हान राखण्यात यश मिळविले. दक्षिण आफ्रिकेने आधी दोन कसोटी, मग तीन एकदिवसीय लढती व नंतर दोन टी-20 सामने जिंकून हिंदुस्थानवर सलग सात विजय मिळविले होते. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अखेर त्यांची विजयाची मालिका खंडित केली.

हिंदुस्थानची अचूक गोलंदाजी

मिळालेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव हिंदुस्थानच्या अचूक गोलंदाजीमुळे 19.1 षटकांत 131 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून रिझा हेन्रिक्स (23), हेन्रिच क्लासेन (20), वायने पार्नेल (नाबाद 22) व केशव महाराज (11) हेच दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. हिंदुस्थानकडून हर्षल पटेल (25/4) व युझवेंद्र चहल (20/3) यांनी दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कापून काढली. भुवनेश्वर कुमार व अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला, पण त्यांनीही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा दिल्या नाहीत.

ऋतुराज, इशान यांची अर्धशतके

कर्णधार रिषभ पंत सलग तिसऱयांदा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 5 बाद 179 धावसंख्या उभारली. ऋतुराज गायकवाड (57) व इशान किशन (54) यांनी अर्धशतके झळकावत 10 षटकांत 97 धावांची खणखणीत सलामी देत दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. ऋतुराजने 35 चेंडूंत 7 चौकारांसह 2 षटकार ठोकले, तर इशानने तितक्याच चेंडूंत 5 चौकारांसह 2 षटकार लगावले. केशव महाराजने ऋतुराजला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद करून ही जोडी फोडली. ड्वेन प्रिटोरियसने इशानला रिझा हेन्रिक्सकरवी झेलबाद केले.

पंड्या खेळला म्हणून…

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर श्रेयस अय्यर (14) व रिषभ पंत (6) हे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याने हिंदुस्थानच्या धावगतीला ब्रेक लागला. हार्दिक पंडय़ाने 21 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 31 धावा केल्याने हिंदुस्थानला पावणेदोनशेचा टप्पा ओलांडता आला.