बांगलादेशचा खेळ तीन दिवसांत खल्लास!‘टीम इंडिया’चा कसोटी विजयाचा षटकार

658

ऑण्टिग्वापासून सुरू झालेला टीम इंडियाच्या विजयाचा सिलसिला सलग सहाव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही कायम राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही कच्चा लिंबू असलेल्या बांगलादेशची पहिल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानच्या भेदक गोलंदाजीपढे दाणादाण उडाली अन् तिसऱ्याच दिवशी त्यांचा खेळ खल्लास झाला. विराट कोहलीच्या टीम इंडियाने एक डाव 130 धावांनी दणदणीत विजय मिळवत आम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वनका म्हणतात हे पाहुण्यांना दाखवून दिले. द्विशतकवीर मयांक अग्रवाल या सामन्याचा मानकरी ठरला. याचबरोबर हिंदुस्थानने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

मुश्फिकुरची अर्धशतकी खेळी

आघाडीची फळी फ्लॉप ठरल्यानंतर मधल्या फळीतील मुश्फिकुर रहीमने अर्धशतकी खेळी करीत बांगलादेशचा पराभव लांबविला. त्याने 150 चेंडूंच्या संयमी खेळीत 64 धावा करताना 7 चौकार लगावले. त्याने लिटन दाससोबत (35) सहाव्या विकेटसाठी 63, तर मेहदी हसनच्या (38) साथीने सातव्या गडय़ासाठी 59 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच बांगलादेशचा दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. रविचंद्रन अश्विनने लिटन दासला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले, तर मेहदी हसनचा उमेश यादवने त्रिफळा उडवला. मुश्फिकरची झुंजार खेळीही अश्विननेच पुजाराकरवी झेलबाद करून संपुष्टात आणली. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 4, तर रविचंद्रन अश्विनने 3 फलंदाज बाद केले. उमेश यादवने 2 बळी टिपले, तर इशांत शर्माने 1 गडी बाद केला.

कोहलीने मोडला धोनीचा विक्रम

कर्णधार विराट कोहलीने शनिवारी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक 10 वेळा डावाने पराभूत करून त्याने महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले. धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने नऊ वेळा डावाने विजय मिळवलेला आहे. याचबरोबर मोहम्मद अझरुद्दीन सौरभ गागुंली यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने अनुक्रमे 8 7 वेळा प्रतिस्पर्धी संघाला डावाने धूळ चारलेली आहे.

स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी

विराट कोहलीने कर्णधार या नात्याने सलग सहावा कसोटी विजय साजरा करून स्वतःच्याच सहा वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली. ‘टीम इंडियाने विंडीजमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 फरकाने, तर त्यानंतर .आफ्रिकेविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची मालिका 3-0 फरकाने जिंकली होती. आता हिंदुस्थानने बांगलादेशला पहिल्या कसोटीत पराभूत करत स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी केली.

संक्षिप्त धावसंख्या

बांगलादेश पहिला डाव  150 धावा.

हिंदुस्थान पहिला डाव  6 बाद 493 (घोषित)

बांगलादेश दुसरा डाव

सर्व बाद 213 (मुश्फिकुर रहीम 64; मोहम्मद शमी 16-7-31-4,  रविचंद्रन अश्विन 14.2-6-42-3).

आपली प्रतिक्रिया द्या