आजपासून टीम इंडियाचा धूमधडाका पाहुणा दक्षिण आफ्रिकन संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक

टी-20 का किंग कोण? उत्तर एकच हिंदुस्थानी संघ. गेल्या दीड वर्षापासून सुसाट असलेली टीम इंडियाची बुलेट आणखी सुपरफास्ट झाली आहे. कसोटी आणि वन डेचा निकाल काहीही असो, टी-20 फक्त टीम इंडियाचीच चालते. आता बाराबती स्टेडियमवरही आत्मविश्वास ठासून भरलेला संघ धूमधडाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आगामी टी-20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी असलेल्या मालिकेत आफ्रिकेला लोळवण्याचे ध्येय संघाने समोर ठेवलेय, मात्र दुसरीकडे हम भी कुछ कम नहीं दाखवत यजमानांना धक्का देण्याचे तंत्र दक्षिण आफ्रिकेने बाळगले आहे. त्यामुळे कोण धमाका देतो आणि कोण धक्का देतो, ते उद्या दिसेलच.

हिंदुस्थानने या वर्षी आशिया कप हरण्याची परंपरा कायम ठेवलीय आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी 2-1 ने मात केलीय. तसेच इंग्लंड, झिम्बाब्वे, श्रीलंकेला हरवलेय. त्यामुळे हिंदुस्थानचा आत्मविश्वास फुग्याएवढा नाही, तर टायरएवढा आणि तोही टय़ूबलेससारखा फुगलाय. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत जगज्जेता संघ आपल्या फलंदाजीची ‘षटकारबाजी’ आणि गोलंदाजीचा ‘पॉवरकट’ एकाच वेळी दाखवणार असा विश्वास आहे.

सध्या प्रत्येक सामन्यात अभिषेक शर्मा ‘ठिणगी’ पाडून पॉवरप्ले पेटवणार, तर शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मधल्या षटकांत गाडी रुळावर ठेवत धावांचा मीटर वाढवणार. मधल्या फळीत हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल आणि शिवम दुबे म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये ‘तुफान’ निश्चित. सर्वांच्या मनगटात क्षणात मॅच फिरवण्याची ताकद. गोलंदाजीत हिंदुस्थान म्हणजे वेग-स्विंग-स्पिनचा बादशाह. जसप्रीत बुमरा पुन्हा सज्ज झालाय. सोबतीला अर्शदीप सिंहची हुशारा असेल. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल फिरकीची अशी जाळी पसरवतील की फलंदाजांना एकेक धावही काढताना दम निघेल.

एकीकडे हिंदुस्थान फॉर्मात आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र चढउतारांमध्ये अडकलाय. गेल्याच महिन्यात पाकिस्तान आणि नामिबियाकडून त्यांना धक्के बसलेत. तरीही सुरुवातीला क्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम अनुभवावर गाडी हाकतील. मधल्या षटकांत ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेव्हिस ‘डायनामाईट’ ठरू शकतात. शेवटी डेव्हिड मिलर आणि माकाx यान्सन ‘फिनिश’ देणार, पण संथ सुरुवात इथे परवडणारी नाही.

संघात अनेक बदल

हिंदुस्थानी संघात शुभमन गिल परतलाय. हार्दिक पंडय़ाही फिट झालाय. त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोण बसेल, याचा अंदाज बांधणे तूर्तास कठीणच आहे. अशीच स्थिती आफ्रिकन संघातही आहे. डेव्हिड मिलर आणि एन्रिक नॉर्किए हे दाखल झालेत. डिकॉकनेही पुनरागमन केलेय. त्यामुळे कोणाला संधी मिळेल ते अनिश्चितच आहे. याच गोंधळात खेळपट्टीचा रागरंगही वेगळाच असण्याची शक्यता आहे. ती वेगाला थोडी साथ आणि फिरकीला थोडे हात देईल. मग संध्याकाळी दव खलनायकाच्या भूमिकेत येईल. थोडक्यात हिंदुस्थानी संघ हातात तलवार घेऊन मैदानात घुसेल तर आफ्रिकन खेळाडू हातात होमवर्क घेऊन शांतपणे उतरतील. एकूण काय तर 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपचा टीझर या मालिकेत रिलीज होईल. त्यात कटक यह तो झांकी है…