कुणाला पंडय़ा नकोय तर कुणाला पंत! टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानच्या दिग्गजांचे संभाव्य संघ जाहीर

हिंदुस्थानच्या टी-20 संघात कुणाची निवड होणार आणि कुणावर अन्याय, याचे अंदाज आता सारेच बांधू लागले आहेत. हिंदुस्थानच्या अनेक दिग्गजांनी आपापल्या पसंतीचे संघ जाहीर केले असून त्यात कुणाला हार्दिक पंडय़ा नकोसा झालाय तर काहींनी ऋषभ पंतला बाहेर काढलेय. प्रत्येकाच्या संभाव्य संघात अनेक बदल असल्यामुळे अमेरिकेचे तिकीट नेमके कुणाला मिळेल, याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. या अनिश्चिततेवर येत्या शनिवारी पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयपीएलच्या आधी हिंदुस्थानी संघातील 9 ते 10 खेळाडू आधीच निश्चित मानले जात होते. मात्र आयपीएलमधील झंझावाती खेळामुळे निवड समितीचा संघ निवडीचा त्रास वाढला आहे. येत्या 1 मेपर्यंत 15 सदस्यीय संघ निवडणे बंधनकारक आहे आणि हिंदुस्थानी संघासाठी येत्या शनिवार-रविवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत कोणत्या खेळाडूंना अमेरिकेचे तिकीट मिळेल, हे निश्चित होईल.

हिंदुस्थानची संघ निवड जाहीर होण्याआधी क्रिकेटमधील दिग्गजांनी आपापले संघ जाहीर करायला सुरुवात केली असून वीरेंद्र सेहवागने आपला अकरा खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यात शुबमन गिल, हार्दिक पंडय़ाचा पत्ता कट केला आहे. सर्वात आगळा संघ अंबाती रायुडूने निवडला आहे, ज्यात त्याने ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ाला बाहेरचा रस्ता दाखवताना दिनेश कार्तिकला घेतले आहे. एवढेच नव्हे तर शुबमनला वगळून रियान परागची निवड केली आहे. इरफान पठाणने निवडलेल्या संघात सर्व खेळाडूंना स्थान देण्याचा प्रयत्न केला असून बिष्णोई किंवा चहल आणि गिल किंवा सॅमसन अशी निवड केली आहे.

राखीव खेळाडू निवडणार निवड समिती

हिंदुस्थानचा 15 खेळाडूंची निवड करणे नक्कीच सोप्पे नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱया खेळाडूंची निवड करायची की जे आंतरराष्ट्रीय कामगिरीवर चमकदार कामगिरी करताहेत त्यांना कायम ठेवायचे ? हा यक्षप्रश्न निवड समितीपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे कुणाची मन दुखावली जाऊ नये म्हणून 15 खेळाडूंसह 5 राखीव खेळाडू निवडून संघनिवडीवर होणारा वाद टाळण्याचा प्रयत्न करील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आता फक्त सहा खेळाडूच निश्चित

आयपीएलमुळे अनेक खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कपसाठी दावा केल्यामुळे आता फक्त रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव या सहा खेळाडूंचे स्थान निश्चित मानले जात असून उर्वरित नऊ खेळाडू यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रियान पराग, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग,  मोहम्मद सिराज, शिवम दुबे,  मयंक यादव, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोई, दिनेश कार्तिक यांच्यातून निवडून उर्वरित खेळाडूंना राखीव म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे.

असा असेल हिंदुस्थानचा

टी -20 संघ

वीरेंद्र सेहवागचा संघ ः

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैसवाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, रिंकू सिंग किंवा शिवम दुबे, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा.

इरफान पठाणचा संघ ः

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैसवाल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग,  मोहम्मद सिराज, रवी बिष्णोई किंवा युझवेंद्र चहल, शुबमन गिल किंवा संजू सॅमसन.

अंबाती रायुडूचा संघ ः

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैसवाल, सूर्यकुमार यादव, रियान पराग, रवींद्र जाडेजा, दिनेश कार्तिक, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग,  मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, मयंक यादव.