
ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये धुमाकूळ घालणारा चोरटा सलमानच्या पनवेल शहर पोलिसांनी इराणी वस्तीत घुसून मुसक्या आवळल्या आहेत. सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी असे या चोरट्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी, लुटमार, दरोडे यांसह चेन स्नॅचिंगसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. खडकपाडा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून पनवेल पोलिसांनी केलेल्या कारवाईचा सिनेस्टाईल थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
पनवेल शहरात चेन स्नॅचिंगच्या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत मोहिते आणि सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे व हजरत पठाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने शोध घेतला असता चोरटा आंबिवलीतील इराणी वस्तीतील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने खडकपाडा पोलिसांच्या मदतीने इराणी वस्तीमध्ये सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी सलमानला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना घेराव घातला. यावेळी सलमानने पोलिसांवर हल्ला करून झटापटही केली. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवत सिनेस्टाईलने त्याला जेरबंद केले.
बंटी बबलीला बेड्या
कल्याण : चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवून सराफांची फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अश्विनी शेवाळे व मयूर पाटोळे अशी या बंटी बाबलीची नावे आहेत. या दोघांनी सराफांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचे शिक्के मारले होते. ते दागिने गहाण ठेवून सराफांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यांना हॉलमार्क मारून देणारा शरण शिवलकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली.
हॉटेलचालकाला मारहाण
कल्याण : डाळ वडा दिला नाही म्हणून गुंडाने हॉटेलचालकाला मारहाण केल्याची घटना काटेमानिवली परिसरात घडली. दिनेश लंके असे या गुंडांचे नाव असून या घटनेनंतर तो फरार झाला आहे. लंके याने मारहाण केल्यानंतर हॉटेलचालकानेही त्याला प्रतिउत्तर दिले. यावर संतापलेल्या लंकेने त्याला शस्त्राचा धाक दाखवत माफी मागण्यास भाग पाडले. परिसरात दहशत माजवणारा हा गुंड सीसीटीव्हीत कैद झाला आहे.