
सामना ऑनलाईन। हैदराबाद
तेलंगणामध्ये सात डिसेंबरला विधानसभा निवडणुका होणार असल्याने उमेदवारांनी आतापासूनच मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार दारोदार फिरायला लागले आहे. भूपालपल्ली मतदारसंघातून याच पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने कहर केला असून त्याच्या उपदव्यापाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
तेलंगाणा राष्ट्र समितीचे माजी प्रवक्ते मधुसूदन चारी यांनी प्रचारादरम्यान थेट न्हाव्याचे दुकान गाठले. ते दुकानात घुसल्याने नाभिकही गांगरला. त्याला पाहून चारी म्हणाले की मी तुला मदत करायला आलो आहे असं म्हणत नाभिकाच्या हातातून वस्तरा घेतला व खुर्चीवर बसलेल्या गिऱ्हाईकाची हजामत करण्यास सुरुवात केली. हजामत करतानाचे आपले फोटो काढण्यात आल्याची खात्री पटल्यानंतर मधुसूदन चारी दुकानाशेजारी असलेल्या हॉटेलमध्ये घुसले. हॉटेलमध्ये थरथरत्या हाताने जेवत असलेल्या एका वृद्धाचं ताट आपल्याकडे ओढून घेत चारी यांनी त्या वृद्धाला डायरेक्ट भरवायलाच सुरुवात केली. घास भरवण्याचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी ते फोटो काढा! अशी सूचना द्यायला विसरले नाहीत.
चारी यांचे फोटो व्हायरल होताच, असे आचरट प्रकार करणाऱ्या उमेदवारांना ऊत आलाय. महबूबनगरमधील टीआरएसचे उमेदवार श्रीनिवास गौड यांनाही स्फुरण चढले. ते एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ गेले. तेथे वाळू उचलणाऱ्या मजूराला मदत करू लागले. फोटोसाठी 2-3 घमेली टाकल्यानंतर ते एका धोब्याच्या दुकानात गेले. तेथे त्यांनी धोब्याच्या हातातली इस्त्री घेतली व कपडयांना इस्त्री करू लागले. नंतर एका टेलरच्या दुकानात जाऊन त्यांनी कपड्यांच्या घड्या घालून दिल्या. या दोघांप्रमाणेच अन्यही काही उमेदवार आहेत ज्यांनी मतांसाठी वाट्टेल ते काम करायला सुरुवात केली आहे. इथले युवक काँग्रेस अध्यक्ष अनिलकुमार यादव यांनी हैदराबादच्या डोसा सेंटरमध्ये डोसे घालायला सुरुवात केली होती. त्याचेही फोटो व्हायरल झाले आहेत.

























































