तेलंगणात आजपासून लॉकडाऊन समाप्त, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्य़ा लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, असे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही बाब स्पष्ट केली असून तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

तेलंगणा राज्याचे आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानंतर लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्या घट होत आहे. त्याचबरोबर कोरोना नियंत्रणात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. तेलंगणात 24 तासात 1 हजार 417 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 6 लाख 10 हजार 834 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एकूण 3 हजार 546 वर पोहोचला आहे.

अनलॉक केले असले तरी सर्व राज्यांना नियमवालीचे पालन करणे आवाश्यक आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे आणि लसीकरण व तपासण्या सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनलॉक संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनलॉक करताना किंवा निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकारांनी काळजी घेण्याची गरज आह, असे या पत्रामध्ये गृह सचिवांनी नमूद केलं आहे.