तेलंगणातील पुरातन शिवमंदिराचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील पुरातन शिवमंदिराचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. रविवारी युनेस्कोतर्फफे ही घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांचं विशेषतः तेलंगणाच्या नागरिकांचं अभिनंदन केलं आहे.

तेलंगणा येथील वारंगल येथे हे शिवमंदिर आहे. या मंदिराचं नाव काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर असं आहे. काकतीय वंशाच्या शिल्पकौशल्याची साक्ष देणारं हे मंदिर आहे. हे जगातलं एकमेव असं शिवमंदिर आहे, ज्याचं नाव त्याचे शिल्पकार रामप्पा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.

एक हजार स्तंभ असलेल्या या पाषाण मंदिराची निर्मिती 12व्या शतकात केली गेली. काकतिया वंशाच्या गणपति देव नावाच्या राजाने इसवी सन 1213मध्ये या मंदिराच्या निर्मितीला सुरुवात केली. मंदिराचे शिल्पकार रामप्पा नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या शिल्पकारीवर प्रसन्न झालेल्या गणपति देवने त्यांचंच नाव या मंदिराला ठेवलं.

जवळपास चाळीस वर्षं या मंदिराचं काम सुरू होतं. सहा फूट उंच जोत्यावर हे मंदिर उभं आहे. या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारतातील दृश्ये कोरण्यात आली आहेत. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात इथे भाविकांची रांग लागते. त्या काळातील अनेक मंदिरे आत भग्नावस्थेत आहेत. पण, अनेक अस्मानी सुलतानी संकटं येऊनही या मंदिराचं विशेष नुकसान झालेलं नाही.

अशा या मंदिराचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच या मंदिराला भेट देऊन तुम्हीही या मंदिराची राजस भव्यता अनुभवा, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.