मटण कमी मिळाले म्हणून लग्नाच्या पंगतीत राडा, 10 जण जखमी; 17 जणांवर गुन्हा दाखल

लग्न म्हटले की उत्साहासह रुसवे-फुगवे, वाद आलेच. पण तेलंगणामधील एका लग्नात विचित्र घटना समोर आली आहे. लग्नातील जेवणात मटण कमी मिळाल्याच्या वादातून वधू आणि वर पक्षातील लोकांनी भरमंडपात राडा घातला. नातेवाईकांनी एकमेकांवर ताट, ग्लास, खुर्च्या, भांडी, काठ्या, दगडासह हातात जे मिळेल ते फेकून मारले. या मारहाणीत 10 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवीपेठ फंक्शन हॉलमध्ये एक विवाह समारंभ सुरु होता. विवाह संपन्न झाल्यानंतर पाहुण्यांची जेवणाची पंगत बसली. याचदरम्यान पंगतीत वाढलेल्या करीमध्ये मटण कमी मिळाले म्हणून वरपक्षाकडील नातेवाईकांनी जेवण वाढणाऱ्यांशी वाद घातला.

वधूपक्षाने हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटण्याऐवजी वाढतच गेला आणि दोन्ही पक्ष एकमेकांसोबत भिडले. हातात मिळेल ती वस्तू एकमेकांवर फेकून मारली. लग्नमंडपाचे अक्षरशः युद्धभूमीमध्ये रुपांतर झाले.

एका व्यक्तीने 100 नंबर डायल करत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी निजामाबादच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सदर घटनेबाबत वधू आणि वधू पक्षातील 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांपैकी कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे न आल्याने एका हवालदाराने तक्रार दाखल केली.