
शंभर कोटी रुपये देऊन तेलंगाणातील चार आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रकरणी चौकशीसाठी तेलंगाणा सरकारने विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले. या पथकाने या प्रकरणी देशातील चार राज्यांमध्ये धाडी घातल्या आहेत. तेलंगाणासह केरळ, कर्नाटक आणि हरियाणामधील सात ठिकाणी या धाडी घातल्या गेल्या. आमदार खरेदी प्रकरणात धर्मगुरू आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सात ठिकाणी धाडी घालून तीन आरोपींना या प्रकरणी अटक केली. त्यात हरियाणाच्या फरीदाबादमधील धर्मगुरू रामचंद्र भारती, हैदराबादमधील व्यापारी नंद कुमार आणि तिरुपती येथील सिम्हयाजी स्वामी यांचा समावेश आहे. याशिवाय केरळच्या कोच्ची येथील डॉक्टर जग्गू यांच्या घराची झडती घेण्यात आली. रामचंद्र भारती यांच्या फरीदाबाद आणि कर्नाटकच्या पुत्तूर येथील निवासस्थानांची झडती घेतली गेली. नंद कुमार याचे हैदराबादच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थान आणि हॉटेलांवर धाडी घातल्या गेल्या.
डॉ. जग्गू हा मुख्य समन्वयक
आमदारांशी संपर्क साधून त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी डॉ. जग्गू याने समन्वयाची भूमिका बजावल्याचे चौकशीत उघड झाले आहे. जग्गू यानेच रामचंद्र भारती आणि अन्य एक आरोपी तुषार यांची ओळख करून दिली. तुषार याने केसीआर सरकारमधील आमदार रोहित रेड्डी यांच्याशी संपर्क साधला होता. तुषार आणि जग्गू यांची घनिष्ठ मैत्री असल्याचे सांगितले जाते. एका आमदाराच्या श्रीनिवास नावाच्या नातेवाईकाने सिम्हयाजी स्वामी याच्यासाठी तिरुपतीहून हैदराबादला येणाऱ्या विमानाचे तिकीट बुक केल्याचे चौकशीत आढळले आहे.



























































