
सामना ऑनालईन। तेलंगणा
नोकरीसाठी इराकला गेलेले 50 तरुण मानव तस्करांच्या जाळ्यात सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्वजण तेलंगणाचे असून इराकमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी देण्याचे आमिष एका एजंटने या तरुणांना दाखवले. पण तिथे गेल्यावर मात्र त्यांना मजूराचे काम करायला भाग पाडले जात असून त्यांचा पासपोर्ट व व्हिजाही या टोळक्याने गायब केला आहे. याविरोधात तक्रार केल्यानंतर त्यांना मदत करण्याऐवजी येथील पोलिसांनी त्यांच्यापैकी 2 जणांना तुरुंगात डांबले आहे.
हे सर्व तरुण तेलंगणातील मंचेरियन शहराचे असून यातील अनेकजण उच्चशिक्षित आहेत. हे सर्वजण चांगल्या नोकरीच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांची ओळख एक व्यक्तीशी झाली. आखाती देशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो असे सांगत त्याने या सर्व तरुणांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले व त्यांना व्हिजिटर व्हिसावर इराकला बोलावले. पण तेथे गेल्यावर त्याने तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे, पासपोर्ट काढून घेतला. त्यानंतर त्यांना एका इमारतीच्या बांधकाम सुरू असलेल्या साईटवर नेले. येथे मिळेल ते काम तुम्ही करायचे असे सांगून एजंटने तिथून पळ काढला. हे बघताच आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. पण पैसे व पासपोर्ट जवळ नसल्याने ते असहाय्य झाले .यामुळे एजंटचे ऐकण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. यादरम्यान, यातील दोन तरुणांनी या टोळक्याच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करत पोलीस ठाणे गाठले. पोलीस आपली मदत करतील असे त्यांना अपेक्षित होते. पण पोलिसांनी त्यांची मदत तर केली नाही उलट त्यांना तुरुंगात डांबले.
सध्या या तरुणांना एर्बिल शहरात ठेवण्यात आले असून त्यांना येथील कायद्याची भिती दाखवत जबरदस्तीने मजुरी करून घेण्यात येत आहे. यापैकी काहीजणांनी घरातल्यांशी संपर्क साधला. त्यावेळी ही घटना उघड झाली. दरम्यान, याप्रकरणात परराष्ठ्रमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी विनंती या तरुणांच्या कुटुंबियांनी केली आहे.

























































