धुळय़ात पुन्हा उष्णतेची लाट; तापमानाचा पारा @ 44

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । धुळे

तापमानाचा पारा वाढत असल्याने दुपारी वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत. गुरुवारी 42 अंश असलेले तापमान शुक्रवारी 44.6 अंश होते. कमी अधिक होणारे तापमानामुळे धुळेकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. रखरखत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे दुपारी 12 वाजेपासूनच वर्दळीचे रस्ते ओस पडत आहेत.

हवामान खात्याने उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला होता. एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने धुळेकरांना चटके बसत आहेत. शहरात थंडगार पाणी, आईस्क्रीम पार्लर, रसवंती, शीतपेयांची दुकाने, लिंबूपाणी, गोला या शीत पदार्थांना मागणी वाढली आहे. सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत. नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घराकडे परतत असल्याने 12 ते 5 वाजेपर्यंत वर्दळ कमी होत असल्याचे दिसून येते.

शरीराला थंडावा मिळावा यासाठी शीतपेयांना मागणी वाढली आहे. दुपारी आणि सायंकाळी शीतपेय स्टॉलवर आता गर्दी होत आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगल्सचा वापर वाढला आहे. घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे. बहुतांश जणांकडे बागायती मोठय़ा आकाराचे रुमाल दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी त्यात अधिक भर पडत आहे. परिणामी धुळेकर शक्यतो दुपारी घराबाहेर निघत नसल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी दिसत आहे.

सकाळपासून जाणवणाऱया उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे. शहरात सर्वदूर हेच चित्र पाहावयास मिळत आहे. शहरात वाढलेल्या तापमानाचा तडाखा बसत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तीव्र उन्हामुळे अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येत असल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे. त्याचप्रमाणे धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे खोकल्याची साथ सुरू असून काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.