राजापूर तालुक्यात तीन मंदिरातील दानपेट्या फोडल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील तीन मंदिरातील दानपेट्या फोडल्याचा प्रकार घडला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. साखर येथील श्री नवलादेवी, करेल येथील श्री देव मानेश्वर, आणि अणसुरे येथील श्री देव गिरेश्वर या तीन मंदिरातील दानपेट्या अज्ञातांकडून फोडण्यात आल्या असून दानपेटीतील रक्कम लंपास करून पेटी या मंदीराच्या जवळपासच फेकण्यात आली आहे. तीन मदिरातील दानपेट्या फोडण्यात आल्याने परिसरात खळबळ आहे.

ही घटना मंगळवारी रात्री घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी या मंदिरातील पुजारी पूजा करण्यास गेले असताना त्यांच्या निदर्शनास चोरीची घटना आली. त्यांनी गावचे पोलीस पाटील, सरपंच तसेच नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर सागरी पोलीस ठाणे नाटे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. रात्री तीन मंदिरात झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील कुंभवडे या ठिकाणी अशाच प्रकारे चोरीची घटना घडली होती. पोलिसांकडून योग्य ती कारवाई करत अशा प्रकारे चोरी करणाऱ्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातून होत आहे.