
आयपीएलमध्ये आता ‘दस का दम’ दिसणार आहे. जगातील महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा आयपीएलच्या 2022 सालातील मोसमात दहा संघांचा सहभाग असणार आहे. बीसीसीआयच्या गुरुवारी अहमदाबाद येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत युएईत आयोजित करण्यात आली होती. कोरोनाच्या काळातही या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला. याच कारणामुळे 2021 सालामध्ये आयपीएलमध्ये आठऐवजी दहा संघांचा सहभाग असायला हवा यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न करण्यात येत होते. पण वेळेच्या अभावामुळे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.
प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना भरपाई मिळणार
कोरोनामुळे हिंदुस्थानात यंदाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा अद्याप झालेल्या नाहीत. दरवर्षी ज्या स्पर्धा खेळवल्या जातात, त्यामध्येही कपात केली जाणार आहे. त्यामुळे देशातील प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. बीसीसीआयने या बैठकीत अशा पुरुष व महिला क्रिकेटपटूंना भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवे संघ कोणते असतील?
आयपीएलमध्ये नवे दोन संघ कोणते असतील, याची चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली आहे. आयपीएलच्या 2022च्या मोसमामध्ये अहमदाबादचा संघ उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी अदाणी व गोयंका ग्रुपमध्ये चुरस लागलेली आहे. तसेच दुसऱ्य़ा संघासाठी पुणे, कानपूर व लखनौ या शहरांच्या नावांची चर्चा सुरू आहे.


























































