
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पाश्चिमात्य देशाबरोबरच आखाती देशात नोकरी मिळवणं हे हिंदुस्थानी तरुणांच स्वप्न असतं. पण हेच आखाती देश हिंदु्स्थानी मजूरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. या देशांमध्ये काम करत असताना दररोज 10 हिंदु्स्थानी मजुर मृत्यूमुखी पडत आहेत. अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे.
कमी वेळात गलेलठ्ठ पगार आणि तेथील उंची राहणीमान यांच हिंदु्स्थानी तरुणांना आकर्षण आहे. यामुळे सौदी अरब, दुबई याबरोबरच इतर आखाती देशात लाखो तरुण नोकरी करण्यासाठी जातात. पण जे हिंदु्स्थानी मजुर म्हणून तेथे जातात त्यांची अवस्था बिकट असल्याचं समोर आलं आहे. कॉमनवेल्थ ह्यूमन राईट्सचे व्यंकटेश नायक यांनी माहितीच्या अधिकाराखाली आखातात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदु्स्थानी नागरिकांबद्दल माहिती मिळवली. त्यात गेल्या 6 वर्षात आखातात दररोज 10 हिंदु्स्थानी मजुरांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. व्यंकटेश यांनी एक जानेवारी 2012 ते 2018 पर्यंत बहरीन, ओमान, कतार,कुवैत, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमीरातीमधील परराष्ट्र मंत्रालयाकडून तेथे राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांची माहिती मिळवली. त्यात हा खळबळजनक खुलासा झाला आहे. पण हे मृत्यू नक्की कशामुळे झाले आहेत. याबाबत मात्र काहीही सांगण्यात आलेले नाही.
यातील आकडेवारीनुसार 2012 ते 2018 पर्यंत आखाती देशात कमीत कमी 24,570 हिंदु्स्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात वाढ होण्याची शक्यताही व्यंकटेश यांनी वर्तवली आहे.

























































