अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षांची सक्त मजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. अवधूत भागणा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना एप्रिल आणि मे २०१४ मध्ये मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे घडली होती.

पिडीत मुलगी तिच्या मामाच्या घरात आईसोबत राहत होती. तर आरोपी हा त्यांच्या घरामागे राहत होता. पिडीत मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपी अवधूत याने जवळीक साधण्यास सुरुवात केली होती. अशातच २०१४ मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तो तिच्या घरात शिरला. तिला बळजबरीने घराच्या माळ्यावर नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. हि गोष्ट पिडीत मुलीने तीच्या आईला सांगीतली. मात्र तीने त्याकडे दुर्लक्ष केले. तो चांगला मुलगा असून तू खोटे आरोप करू नकोस, असे म्हणत तीलाच गप्प राहण्याचा सल्ला दिला. हि बाब जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी स्वतः य़ा प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपी अवधूत विरोधात भादवी कलम ३७६ आणि पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात झाली. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्हि. एम. मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी शासकीय अभिव्योक्ता म्हणून अँड. अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकुण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी महिला पोलीस अधिकारी, मनिषा जाधव आणि पिडीत मुलगी यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभिव्योक्ता बांदिवडेकर- पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि आरोपी अवधूत यास भादवी कलम ३७६ (२) (आय) आणि पॉस्को कायद्यातील कलम ५ (एम) ,६ अन्वये दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भादवी कलम ५०६ अन्वये २ वर्ष कारावास आणि दोन हजार रुपया दंडही ठोठावला. पिडीत मुलीच्या आईलाही न्यायालयाने पॉस्को कायद्यातील तरतुदीनुसार दोषी ठरवत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.