शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी काढणार ४५ कोटींची निविदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक मनपाच्या वतीने एमजीएमजवळील प्रियदर्शनी उद्यानाच्या १७ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. मुंबई येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पीएमसीने प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले. पक्षप्रमुखांनी दोन टप्प्यात स्मारकाचे काम न करता एका टप्प्यात करण्याची सूचना केली. त्यामुळे दोन्ही टप्प्यातील कामांसाठी ४५ कोटी रुपयांची एकच निविदा काढण्याचे निश्चित झाले आहे. ही निविदा डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज मंगळवारी पत्रकारांना दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर सोमवारी मुंबईत पीएमसीने शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणीच्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन आदींची उपस्थिती होती. मनपाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिवन आणि स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या प्रकल्पासाठी एकूण ४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मनपाला दिलेला आहे. त्यानंतर मनपाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. पीएमसीने या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा बनविला. या आराखड्याचे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

मनपाने पहिल्या टप्प्यात २८ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात १७ कोटी रुपयांच्या कामांची निविदा काढण्याचे ठरविले होते. मात्र दोन्ही कामांसाठी एकदाच आणि एकच निविदा काढण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार आता डिसेंबर महिन्यातच ४५ कोटी रुपयांची एकच निविदा काढण्यात येईल. २५ रोजी पीएमसीचे प्रतिनिधी येणार असून त्यांच्यासोबत निविदा काढण्यासंदर्भात चर्चा करून निविदा काढण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौरांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.