लोअर परळ उड्डाणपुलाच्या तोडकामासाठी १५ ऑगस्ट रोजी निविदा उघडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोअर परळचा डेलीस उड्डाणपूल कोण बांधणार यावर प्रश्नचिन्ह कायम असतानाच पश्चिम रेल्वेने रेल्वेच्या हद्दीतील धोकादायक पूल पाडण्यासाठी निविदा काढण्याची तयारी पूर्ण केली असून येत्या १५ ऑगस्ट रोजी ही निविदा उघडणार आहे. हा पूल पाडण्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे.

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाचा पादचारी भाग कोसळल्यानंतर पश्चिम रेल्वेने आपल्या हद्दीतील सर्व पुलांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत २९ उड्डाणपुलांपैकी २१ पुलांचे सर्वेक्षण पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यापैकी लोअर परळचा डेलीस उड्डाणपूल हा गंजला असून त्याची तातडीची पुनर्बांधणी करण्यात यावी असा अहवाल आयआयटीच्या तज्ञांनी दिला आहे. पुलाची पुनर्बांधणी कोणी करायची यावर आठ दिवसांनंतरही निर्णय झालेला नाही. त्याआधीच पश्चिम रेल्वेने हा धोकादायक पूल पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया प्रारंभ केली आहे. लोअर परळ पूल पाडण्यासाठी साधारण तीन ते साडेतीन महिने लागणार असून अधिकाधिक काम मध्यरात्रीचा ब्लॉक घेऊन करण्यावर भर दिला जाणार आहे.