कोरोना इफेक्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमही पुढे ढकलणार

कोरोनाचा फटका क्रीडाविश्वालाही बसला आहे. याचे पडसाद महत्त्वाच्या स्पर्धांवर उमटताना दिसले. काही स्पर्धा रद्द झाल्या, काही स्पर्धा पुढे ढकलल्या. आता हे वर्ष संपत आले आहे, पण कोरोना काही संपलेला नाहीए. काही देशांमध्ये दुसरी लाटही आलीय. याचा धसका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या आयोजकांनीही घेतला आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा जानेवारीऐवजी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती तेथील एका वर्तमानपत्रामधून समोर आली आहे.

याआधी डिसेंबर महिन्यात टेनिसपटूंना ऑस्ट्रेलियात बोलावून क्वारंटाइन कालावधीचा पूर्ण करवून घेण्याची योजना टेनिस ऑस्ट्रेलियाकडून करण्यात येत होती. यामुळे जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा व्यवस्थित पार पडेल असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात कोरोना अद्याप कमी झालेला नाहीए. तसेच लसही आलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या नियोजित वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. दरम्यान, व्हिक्टोरिया प्रीमियरचे डॅनियल ऍण्ड्रय़ूस यावेळी म्हणाले, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम ही स्पर्धा पुढल्या वर्षी पहिल्या टप्प्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या