लिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश, ममता बॅनर्जींच्या उपस्थित TMC चा झेंडा घेतला हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या आणखी एक खेळाडूची राजकारणाच्या मैदानात एन्ट्री झाली आहे. दिग्गज टेनिस खेळाडू लिएंडर पेस याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत लिएंडर पेस याने टीएमसीचा झेंडा हाती घेतला.

ममता बॅनर्जी या सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक दिग्गजांनी तृणमूल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यात हिंदुस्थानचा माजी टेनिस खेळाडू लिएंडर पेससह अभिनेत्री आणि काँग्रेसच्या माजी नेत्या नफिसा अली यांचाही समावेश आहे.

टीएमसीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर लिएंडर पेस म्हणाला की, ‘मी 14 वर्षांचा होतो तेव्हा ममता बॅनर्जी या क्रीडामंत्री होत्या आणि त्यांनी मला माझी स्वप्ने पूर्ण करण्याएवढे सक्षम बनवले. आता मी टेनिसमधून सन्यास घेतला आहे. मी आता ममता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आलो आहे, कारण माझे मूळ जेथील आहे तेथील लोकांची मला सेवा करायची आहे.’

पेस छोटा भाऊ

ममता बॅनर्जी यांनीही लिएंडर पेस याचे कौतुक केले आणि त्याचे पक्षामध्ये स्वागत केले. लिएंडर पेस माझ्या छोट्या भावासारखा आहे, असेही ममता म्हणाल्या. तसेच मी यूथ मिनिस्टर असल्यापासून त्याला ओळखते असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधत आहे. टीएमसी चर्चित चेहऱ्यांना पक्षामध्ये प्रवेश देत असून यासाठीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गोव्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत.